सुरूवात..अस्तित्वाची..विकासाची

 

गर्भधारणा झाल्यानंतर त्या गर्भात जेव्हा हृदयाची हालचाल दिसायला लागते त्या क्षणी आपल्या /त्या जीवाच्या अस्तित्वाला खर्या अर्थाने सुरूवात होते आणि मग ९ महिने त्या गर्भाची वाढ होऊन मग आईच्या उदरातून बाहेरच्या जगात ट्यॅ हॅ फोडत बाहेरच्या जगात जगण्याची सुरूवात होते.हे ९ महिने या सुरूवातीच्या विकासासाठी खूप महत्वाचे असतात.

मुळात जी गर्भधारणा झाली आहे त्याविषयीच्या त्या आईच्या भावना  सकारात्मक असतील,म्हणजेच ती लादली गेली नसणं,मनापासून त्या गर्भाचं स्वागत झालं असणं खूप आवश्यक आहे.एकूणच त्या संपूर्ण काळात आईच्या शारिरीक काळजीबरोबरच मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे खूप आवश्यक असते,काळजी इतरांबरोबरच त्या आईने सुद्धा घ्यायला हवी! म्हणजे शक्यतो आपले दैनंदिन काम चालू ठेवून(डॉ चा बेडरेस्टचा सल्ला असेल तर अर्थात त्याप्रमाणे)जोडीला ध्यानधारणा,संगीत /वाद्य ऐकणे/वाजवणे,विविध पुस्तकांचे वाचन करणे,जोडीने चालायला जाणे,गर्भाशी संवाद साधणे,पतीपत्नी व कुटुंबियांनी सुसंवाद साधणे/गप्पा मारणे अशा गोष्टी केल्याने मन आरोग्य चांगले रहाण्यास मदत होते व गर्भाची चांगली वाढ होण्यास मदत होते.याकाळात तरीही एखादीला चिंता/नैराश्याची लक्षणे आढळली उदा सतत अस्वस्थ वाटणे,उदास वाटणे,नकारात्मक विचार येणे,कशात एकाग्रता न होणे,भीती वाटणे वगैरे तर मात्रं मानसतज्ञांचा सल्ला घेणं इष्ट ठरेल!अशा प्रकारे तणावरहित ते आनंदी वातावरणात गर्भावस्था पार पडली तर जन्माला येणारं बाळ सर्वार्थाने सुदृढ असेल! त्याच्या गर्भावस्थेतील विकासाची चांगली सुरूवात झाली असेल!

जन्माला आल्यावर बाळाचं हळूहळू आईशी नातं घट्ट व्हायला लागतं,आईची ओळख व्हायला लागते,बाबा पण खूप वेळ देत असेल तर त्याची पण व्हायला लागते,त्यांच्याकडे बघून हसू येणं वगैरे दिसायला लागतं,मग हळूहळू पालथं होणं,सरकणं,रांगणं,बसणं,उभं रहाणं,एक एक पाऊल पुढे टाकंत चालायला लागतं.त्याच्याच आधी ते बाबा दादा वगैरे बोलायला लागतं,मग दीड दोन वर्षापर्यंत वाक्य वगैरे बोलायला लागतं ,त्याचे ते बोबडे शब्द मनाला अगदी मोहवून टाकतात.तिसर्या वर्षापर्यंत ते शू /शी आल्याचे स्वत:हून सांगायला लागते.हा सगळा विकास होताना जितका त्या बाळाशी आई बाबा व इतर घरचे,आजूबाजूचे यांच्याशी संवाद जास्त तेवढी त्याची प्रगती छान होते!  पण त्याच बरोबर लहान वयापासूनच त्या बाळाला छान व्यक्त होण्याची सवय लागायला लागते, अति संरक्षितपणा व दुर्लक्ष याचा सुवर्णमध्य हवा.सारखे उचलून घेणे,जरा रडलं की अगदी आपलाच अपराध वाटून त्याला उचलणे हे टाळायला हवे.शी शूच्या सवयी पण अजिबात जबरदस्ती न करता शिकवायला हव्यात पण म्हणून डायपरचा अति व अतिकाळ वापर टाळला पाहिजे! ही पहिली ३ वर्षे कशी हसत खेळत जायला हवीत.त्यामुळे आईबाबा यांनी जास्त प्रतीचा (क्वालिटी टाईम)देणं,आपसात घरात सौहार्द असणं खूप गरजेचं आहे!!

बाळाला भरवताना,आपल्याला काम करता यावं म्हणून..मोबाईलचा उपयोग टाळायलाच हवा त्याऐवजी गोष्टी सांगाव्यात,सांगता येत नसतील तर पुस्तकातून वाचून दाखवा पण मोबाईलची ओळख टाळलेलीच बरी!!

पण हिच प्रगती खूपच हळू होत्ये,आवाज काढायला लागलेलं मूल पुढे बोलंतंच नाही आहे किंवा आधी पासूनच आई बाबा कडे बघतच नाही आहे,हाक मारली तरी आपल्यातच मग्न पण कुठचं गाणं लागलं की तिकडे मात्रं बघणं असं करत असेल तर ही मतिमंदत्व वा स्वमग्नतेची (विकासातील विकार)सुरूवात असू शकते.त्यामुळे कळल्यावर लगेच डॉक्टरना दाखवणे,मानसतज्ञांना दाखवणे व लवकरात लवकर व्यवसायोपचार (ऑक्युपेशन थेरपी) व वाचा उपचार (स्पीच थेरपी) सुरू केल्यास खूप चांगला फायदा होतो.जितक्या लवकर सुरूवात तितका सुधारणेसाठी फायदा अधिक होतो.आपोआप होईल सुधारणा…असा दृष्टिकोन टाळायला हवा.

जेवढी निकोप सुरूवात तेवढ पुढचं जगणं घडणं पण सुंदर होतं!

                            ---- डॉ अद्वैत पाध्ये





 


Comments

Popular posts from this blog

सुरूवात शिकायची.....

सुरूवात!!