सुरूवात शिकायची.....

एक आई तिच्या साडेतीन वर्षाच्या मुलीला घेऊन आली होती.मी विचारलं," काय समस्या आहे?" तर ती म्हणली," डॉक्टट,अहो ही अभ्यास करतच नाही" मी विचारलं,"वय किती या चिमुकलीचं?"उत्तर आलं,"साडेतीन आहे" मी मनातल्या मनात कपाळाला हात मारला!! साडेतीन वर्षाची" प्ले ग्रूप " मध्ये जाणार्या मुलीला अभ्यास शिकवला जातो व तो करण्याची पालक पण अपेक्षा करतात यापेक्षा आपल्या शिक्षण व्यवस्थेची दुर्दशा व मुलांचे दुर्दैव ते कोणते?

नावातच प्ले ग्रूप असा शब्द असताना (फॉर्मल एज्युकेशन)औपचारिक  शिक्षण अपेक्षितच नाही.असं असताना तो घेतला जातो व पालक पण तशी अपेक्षा ठेवत असतील तर तो मुलांवर अन्याय आहे! हसत खेळत,इतर मुलांशी हळूहळू ओळख करत गाणी,गोष्टी शिकणं व फारतर तोंडी अंक/अक्षर ओळख होणं एवढंच त्या बालवाडी किंवा प्ले ग्रूप,नर्सरी मधे  व्हायला हवं.पण आजकाल गर्भावस्थेतच आयांनी शाळेत जाऊन " अभिमन्यू" घडवणं एवढंच बाकी राहिलंय!

खरंतर प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवं.आपण स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना केली पण त्या त्या राज्याच्या भाषेतून/मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य करायला हवे होते,इंग्लिश माध्यम हा पर्याय ठेवायला नकोच होता,ती एक भाषा म्हणन शिकायला ठेवण्यास काही हरकत नव्हती.उलट त्यामुळे परकिय आकर्षणाची मानसिकता कमी झाली असती पण झाले उलटेच! आता तर सो कॉ्ड इंटरनॅशनल बोर्ड्सच्या शाळांची बाजारू व्यवस्था वाढली आहे! त्याच शाळांंमधे मुलांना घालण्याची पालकांची अहमहिका लागलेली दिसते!! मग त्यात सामान्य बुद्धिमत्तेची मुलं मागे पडतात व आत्मविश्वास गमावून बसताना आढळतात! आज त्या शाळांमधे मराठी अनिवार्य केलं असलं तरी ते "कमी दर्जाचं " असतं जसं मराठी माध्यमात इंग्रजी 'कमी दर्जाचं' ! अशा भाषा कमी व जास्त दर्जाच्या कशा असू शकतात?

त्यामुळे आपल्या मुला/मुलीच्या शिक्षणाची सुरूवात करताना त्याला वा तिला काय जमेल व आपल्यालाही तो अभ्यास जमेल ना याचा विचार करावा.बरेचदा अल्पशिक्षित पालक परवडतं म्हणून इंटरनॅशनल स्कूल मधे घालताना दिसतात! मग ते काय मुलाला मदत करणार? त्यामुळे मुला/मुलींच्या व आपल्या कुवतीचा विचार करावा,त्याच बरोबर इंटरनॅशनल स्कूलमधे घातलं तरी आपल्या मातृभाषेशिक्षचं अनौपचारिक शिक्षण घरी द्यायला हवं,असं माझं स्पष्ट मतं आहे! तसंच प्ले ग्रूप वगैरे मधे अनौपचारिक शिक्षणच असायला हवं असा आग्र्ह असावा,त्या वयात मुलांनी अभ्यास करावा ही अपेक्षाच पालकांनी ठेवायचीच नाही!

प्राथमिक शिक्षणाच्या काळात मुलांना अभ्यासाचे दडपण न येता गोडी कशी लागेल हे बघणे आवश्यक आहे.त्यामुळे उगाच शिकवणी वगैरे न लावता घरीच अभ्यास घेतला पाहिजे व मुलांना खेळायला मिळेल भरपूर हे बघितले पाहिजे.व्यक्तिमत्व विकासासाठी उगीच छंदवर्गात "अडकवणे" टाळले पाहिजे.खरंच आवंड व कल आहे असे आढळले तरच एखादा वर्ग लावावा.

मुलं या काळात आपणा पालकांना बघतच शिकत असतात,त्यामुळे मुलांकडून अपेक्षित वागणे आपलेही असावे!  "लोका सांगे.." असे नसावे.मुलांसमोर आपले मतभेद दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी व अपरोक्ष चर्चा करावी व मतभेदातून मार्ग काढावा!इतर मुलांचे बघून मुलं विविध मागण्या करतात तर" नाही " म्हणून त्यावर चिकटून रहायला शिकावे,मुलांनी कितीही आरडाओरडा केला तरी!!पालकांना मुलं बरोबर ओळखतात,हट्टाला कोण लवकर बधेल हे त्यांना माहित असतं मग त्या व्यक्तिसमोर मुद्दामहून हट्ट केला जातो व मागणी पदरात पाडली जाते त्यामुळे अशावेळी दुसर्या पालकाला (आई/बाबा)विचारून सांगण्याचा आग्रर धरायला हवा.

थोडक्यात,मुलांच्या या वयात नियंत्रकाची  भूमिका असली तरी तो समजूतदार नियंत्रर हवा,मूल दुखावले जाणार नाही पण योग्य ते शिकेल असे संतुलन साधता यायला हवे.पालकत्व ही शिकत रहायची बाब आहे,फक्त आपली लवचिकता हवी,चुका मान्य करून बदल करता यायला हवा.

            शिकणे कसे व्हावे,खेळत हसत

            गोडी लागावी मनाला परत परत

           पालक होणे म्हणजे शिकतच रहाणे

           चुकातून आपल्या आणि त्याच्यापण

          विकास घडतच रहाणार असतो

          आपण फक्त हातभार लावायचा असतो!!

                             ------डॉ.अद्वैत पाध्ये



 







Comments

  1. खूप छान डॉक्टर, पालकत्व हे शिकत रहायची गोष्ट आहे हे तर १००%खरं .
    मुलं जशी मोठी होतात तसे पालक म्हणून आपण मोठे होत असतो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सुरूवात!!

सुरूवात..अस्तित्वाची..विकासाची